मिठाचा कायदा मोडण्याचा कार्यक्रम सबंध मे महिन्यात राबविल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंगलाविषीचे कायदे मोडण्याची मोहीम हाती घेतली. ग्रामीण भागातील माणसांना जगण्यासाठी जमीन, जनावर आणि जंगल या तीन गोष्टींची गरज असते. इंग्रजी राजवटीत 1866 नंतर जंगलांबाबत अनेक निर्बंध लादले गेले. आरक्षित जंगलांत गुरे चारण्यास, गवत व झाडे तोडण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे आदिवासींना जळणासाठी लाकूडफाटा, फळे, वनस्पती वनसंरक्षकाची नजर चुकवून गोळा कराव्या लागत. जंगलासंबंधीच्या कायद्यातील जाचक तरतुदींबद्दलचा असंतोष लक्षात घेऊन मिठाच्या कायद्याप्रमाणेच जंगलांसंबंधीचे कायदे मोडून सत्याग्रह मोहिमेची व्याप्ती 1930 च्या जुलैपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले हे तालुके ही चळवळ करण्यास अनुकूल क्षेत्र ठरतील असे जंगल सत्याग्रह समितीला वाटले आणि तिचे मुख्य कार्यालय संगमनेरला उघडण्यात आले. रामकृष्णदास महाराज, लालजी पेंडसे आणि श्रीपाद शंकर नवरे हे तिघे या सत्याग्रहाचे सूत्रधार होते. सागराकडून आता पर्वताकडे आपण जात असल्याचे नवरे यांनी पत्रक काढून जाहीर केले. या सत्याग्रहात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीनिवास सरदेसाई, भाई सड्डा यांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. 22 जुलै 1930 रोजी संगमनेर आणि अकोले तालुक्यात आषाढी एकादशीच्या दिवशी एकाच वेळी 20-22 ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला. कोपरगाव आणि राहुरी तालुक्यातही जंगल सत्याग्रहाचे लोण पसरले होते. कायदेभंग करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस गेले, तर हजारों लोक त्यांना प्रतिबंध करत असल्याचे अनोखे दृश्य चंदनपुरी व सावरगाव या खेड्यांत दिसले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, बागलाण, कळवण तालुक्यात जंगल सत्याग्रह जोरात होता. दादासाहेब गद्रे, महंत सीतारामशास्त्री आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे बागलाणातील सत्याग्रहाचे प्रमुख नेते होते. डांग हा तर जंगलांचा प्रदेश. तेथील कोळी व ठाकर हे आदिवासीही जंगल सत्याग्रहात ओढले गेले. वनचराईसाठी लादलेला कर त्यांच्याकडून वसूल करणे सरकारी नोकरांना अवघड होऊ लागले. सशस्त्र पोलिसांचाही त्यांना धाक वाटेनासा झाला. 5 ऑगस्टला बागलाणातील भिलवड येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला तेव्हा त्यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मिठाचा कायदा आणि जंगलाबद्दलचा कायदा मोडण्याच्या कार्यक्रमामुळे आधीच जागतिक महामंदीच्या लाटेमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह आंदोलनात जसा भाग घेतला, तसा आधीच्या चळवळीत कधीही घेतला नव्हता. मिठाचा कायदा मोडल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणता कायदा मोडण्याची मोहीम सुरू केली?
उत्तर: जंगल कायदा