जीवावरण :विविध प्रकारचे जीवित ज्यात आढळते असे पृथ्वीभोवतालचे आवरण. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या वातावरणाचा सु. 10,000 मी. जाडीचा थर, शिलावरणाचा सु. 2,000 मी. जाडीचा भाग (भूपृष्ठ, खडक इ.) व जलावरणाचा 10,863 मी. च्या महत्तम खोलीपर्यंतचा बहुतेक सर्व भाग, अशा तीन वेगवेगळ्या विभागांचा जीवावरणात समावेश केला जातो. अनेक प्रकारच्या वनस्पती, विविध पशू आणि पक्षी, जलचर प्राणी, मनुष्य प्राणी, कीटक व असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव जीवावरणात वास्तव्य करतात. खाणीतून नुकत्याच खणून काढलेल्या खडकातून झिरपणाऱ्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले आहेत. खनिज तेलाचे निक्षेप (साठे) साधारणपणे भूपृष्ठापासून ते 6,550 मी.च्या खोलीपर्यंत सापडले आहेत. त्यातील पृष्ठभागापासून 2,000 मी.पर्यंतच्या काही थरांत खनिज तेलाच्या निक्षेपांबरोबर काही सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व आढळून आले आहे. मुक्त वातावरणात 10 किमी. उंचीपर्यंत सूक्ष्मजंतू आणि कवक-बीजुके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचे प्रजोत्पादक भाग) गोळा केली गेली आहेत. मौंट एव्हरेस्टसारख्या उत्तुंग पर्वतशिखरांच्या परिसरात 8,230 मी. उंचीवर पक्षी उडत असलेले आढळले आहेत. काही भूचर प्राणी मौंट एव्हरेस्टच्या 6,700 मी. उंचीपर्यंत चढून जाऊ शकतात. त्याच उंचीवर उड्या मारीत जाणाऱ्या अविकसित कोळ्यांचे प्रकारही दिसून आले आहेत. वातावरणातील सूक्ष्मजीव, कीटक, सूक्ष्मजंतू आणि काही प्राणी यांच्या मानाने हरित वनस्पती कमी उंचीवर आढळतात. हिमनदीय लार्कस्परसारखी हरित वनस्पती हिमालयात मौंट एव्हरेस्टच्या परिसरात 6,200 मी. उंचीवर दिसते. पक्षी त्यापेक्षा दोन किमी. अधिक उंचीवरून उडू शकतात. समुद्रातील वनस्पतिजीवनास आवश्यक असणारा सूर्यप्रकाश फार खोलवर पोहोचत नसल्यामुळे जलावरणातही जलीय वनस्पती जलपृष्ठापासून जास्त खोलीवर अस्तित्वात असलेल्या दिसत नाहीत. शैवले 350 मी. खोलीच्या पलीकडे बहुधा आढळतच नाहीत. सूक्ष्मजीव त्यापेक्षा कित्येक हजार मीटरांच्या खोलीवर आढळतात. अशा रीतीने जीवावरणाच्या मूलभूत रचनेत एक वैचित्र्यपूर्ण परिस्थिती आढळते. वातावरणाची 10 किमी. जाडी व जलावरणाची 10·8 किमी. जाडी लक्षात घेता संपूर्ण जीवावरणाची महत्तम जाडी 21 किमी. इतकी आहे. परंतु जीवावरणातील असंख्य जीवांना ज्यांच्यापासून खाद्य मिळते त्या वनस्पती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणात 6·2 किमी. उंच आणी भूपृष्ठाच्या खाली 350 मी. खोल अशा जीवावरणाच्या फक्त 6·55 किमी. जाडीच्या थरातच वाढतात. वास्तविक पोषक वनस्पतींच्या उत्पादनाचे क्षेत्र व त्यांच्यावर जगणाऱ्या प्राण्यांचे संचारणक्षेत्र ही दोन्ही क्षेत्रे सारख्याच जाडीची असावयास पाहिजेत पण जीवावरणात तशी परिस्थिती आढळत नाही. जीवावरणामधील पोषक वनस्पतींचे उत्पादनक्षेत्र फक्त 6·5 किमी. जाडीचे असताना संपूर्ण जीवावरण त्याच्या तिप्पट जाडीच्या क्षेत्रात सामाविलेले असावे, ही घटना जरा विलक्षणच वाटते व पोषक वनस्पतींचा पट्टा सोडून जीव किंवा सूक्ष्मजंतू आपल्या खाद्यापासून इतके दूर कसे राहू शकतात, असा प्रश्न उत्पन्न होतो. मौंट एव्हरेस्टच्या परिसरात पक्षी कोणत्या उंचीवर उडताना दिसले आहेत?
उत्तर: 8,230 मीटर